बुलडाणा // महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षातर्फे इंधन दरवाढ,महागाई,बेरोजगारी, काळे कृषी कायदे या विरोधात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती २९ नोव्हेंबर पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानाची माहिती आज एका पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली.काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, बुलडाणा जिल्हा प्रभारी नाना गावंडे, मदन भरगड, लक्ष्मणराव घुमरे आदिंनी संबोधित केले.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला ८ वर्ष पुर्ण झालेली आहे. मोदी सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. कृत्रिमरीत्या महागाई वाढवून देशाची आर्थीक व्यवस्था उध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. सर्व सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते गावा गावात फेऱ्या काढून जागर करून थेट संवाद साधणार आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या जनविरोधी धोरणांचा फर्दाफाश करणार आहे. दिनांक 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या पंधरवाड्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावा गावात प्रभात फेऱ्या काढून जनजागृती करतील,पक्षाचा झेंडा व गांधी टोपी परिधान करून घरोघरी जावुन भाजपा सरकारचा नाकरर्तेपणा जनतेच्या नजरेत आणून देतील असं यावेळी सांगण्यात आलं.