आदित्य ठाकरेंच्या निर्णयावर कॉंग्रेसचं बोट, थेट राज्यपालांना दखल घेण्याची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि शिवसेनेमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. राज्यात एकीकडे कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचं सरकार आहे. तरीही कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींना निधी मिळत नाही. अशी कॉंग्रेसची तक्रार आहे. यावेळी कॉंग्रेसने थेट आदित्य ठाकरे यांच्याकडेच बोट दाखवले आहे.
कॉंग्रेस नेते जनार्धन चांदुरकर यांनी पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी खास निधी मंजूर केल्याची टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शहरातील ४३ शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये ब्युटीफिकेशनसाठी डीपीडीसीच्या फंडातून मजूर केले असल्याचं चाकुरकर यांनी म्हटलं आहे. हा आदेश मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला असून पुढील कार्यवाहीसाठी म्हाडाकडे गेला आहे. मुंबईत पैसे आले त्याचा आनंद आहे, परंतु येणाऱ्या BMC च्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या ४३ नगरसेवकांच्या मतदारसंघामध्ये ब्युटिफिकेशनचं असं काम DPDC च्या इतिहासात पहिल्यांदाच मंजूर करण्यात आलं आहे. ही बाब घटनाबाह्य आहे. असं चाकुरकर यांनी म्हटलं आहे. तसंच याची सर्व राजकीय पक्षांनी आणि राज्यपालांनी दखल घेतली पाहिजे.
या निधीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांना कल्पना आहे का? असा सवाल देखील कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा हे तत्व शिवसेनेला मान्य नाही, ही घटनाबाह्य बाब असल्याने या प्रकाराकडे लक्ष द्यावं, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, की बेकायदेशीर आदेश असतील तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ते मंजूर करू नये. असं म्हणत कॉंग्रेस नेते जर्नादन चांदूरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्याच निर्णयाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये दुरावा पाहायला मिळणार. हे निश्चित.