काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठरलं भाजपच्या पराभवाचं सूत्र

कर्नाटकमधील विजयानंतर आता काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच काँग्रेसच्या हैद्राबाद येथील कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या पराभवाचं सूत्र ठरलं आहे.

Update: 2023-09-17 11:40 GMT

यंदाच्या वर्षअखेरीस पाच राज्यात विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापार्श्वभुमीवर तेलंगणाची राजधानी हैद्राबाद मध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या पराभवाचं सूत्र ठरलं आहे.

वर्षाअखेरीस तेलंगणा, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि छत्तीसगड या पाच राज्यात विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांसंदर्भातील रणनितीवर शनिवारी चर्चा करण्यात आली. त्याबरोबरच 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दक्षिण भारतातून काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. या बैठकीत तीन ठराव मंजूर झाले. त्यात संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर विधेयक आणण्यात यावं. जातीय जनगणना करण्यात यावी आणि ओमान चंडी यांच्या निधनावर शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

या बैठकीनंतर रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्वीट करून काँग्रेसच्या कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, आपल्या समोर असलेल्या आव्हानांची जाणीव आहे. ही आव्हानं केवळ काँग्रेस पक्षासमोरची नाहीत. ही आव्हानं भारतीय लोकशाही आणि राज्यघटना जतन करण्याची आहेत.

येत्या दोन-तीन महिन्यात पाच राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणूक ही सहा महिन्यांवर आली आहे. त्यासाठी आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी आपण तयार असलं पाहिजे.

छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्या ठिकाणी सामाजिक न्यायाचे आणि लोक कल्याणाचे नवे मॉडेल तयार केला आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमधील लोक कल्याणकारी योजना देशभर घेऊन जाव्यात, असंही यामध्ये म्हटलं आहे.

सध्याचा काळ हा काँग्रेससाठी आरामाचा काळ नाही. गेल्या दहा वर्षात भाजप सरकारमध्ये लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. गरीब, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान पाहू शकले नाहीत.

अशा परिस्थितीत आपण एकत्र राहून हिटलरशाहीचा पराभव करून देशाची लोकशाही वाचवायला हवी.

सध्या देशातील नागरिक हे पर्याय शोधत आहेत. त्यामुळेच हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळाल्याचा पुरावा आहे.

न थकता काँग्रेसने काम केलं पाहिजे. त्यामध्ये वैयक्तिक हेवे-दावे बाजूला ठेवले पाहिजेत. सर्वात आधी पक्षाला प्राथमिकता द्यायला हवी.

सांघिक एकता ही सर्वोच्च स्थानी असावी. त्यामुळेच शिस्त आणि एकता यांच्या बळावर आपण शत्रूचा पराभव करू शकतो. हे आपण कर्नाटकमध्ये सिद्ध करून दाखवलं आहे. एकतेमुळे आपण यश मिळवू शकतो.

2024 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षपदाची शताब्दीसुद्धा आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करून 2024 मध्ये महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याची संधी आहे.

त्यामुळेच तेलंगणातून देशाला काँग्रेसची ताकद आणि थेट संदेश देण्यात येत आहे, असं मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News