भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व दलित सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी भाजपा सरकारं त्यांना पाठीशी घालत आहेत. असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
महिला व दलितांवरील अत्याचाराविरोधात काँग्रेसने आवाज उठवला असून उद्या बु़धवार दि. ४ नोव्हेंबर रोजी महिला व दलित अत्याचार विरोधी दिवस पाळला जाणार आहे. दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित वाल्मिकी कुटुंबावर झालेले अन्याय अत्याचार देशाने पाहिले आहेत. या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे. उत्तर प्रदेशसह देशातील भाजपशासित राज्य सरकारे तसेच नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात महिला व दलित समाजावर अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात भाजपा सरकारे अपयशी ठरली आहेत. गुन्हेगारांना शासन देण्याऐवजी या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम भाजप सरकारकडून होत आहे. या निर्ढावलेल्या भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडित कुटुंबांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन पुकारलं असल्याचं कॉंग्रेसने म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होणा-या या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.भाजपशासित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा चैत्यभूमीवर एल्गार!