अर्णबच्या अटकेसाठी काँग्रेसचे रिपब्लिकच्या ऑफिसबाहेर आंदोलन

Update: 2021-01-22 09:29 GMT

अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसनं शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या कथित व्हॉट्सअप चॅटवरुन कारवाईच्या मागणीसाठी मैदानात उतरत आंदोलन केले. रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयावर काँग्रेसने मोर्चा काढला. पण काँग्रेसचा हा मोर्चा पोलिसांनी कमला मिलबाहेर अडवला.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णबविरोधात घोषणाबाजी केली तसेच अर्णबला तात्काळ अटक करण्याची देखील मागणी केली. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता या दोघांच्या व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.

विशेषतः बालाकोट सर्जिकल स्ट्राईक होण्याच्या तीन दिवस आधी याची माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली? असा सवालही काँग्रेसकडून विचारला जात आहे. यावर भाजप गप्प का ? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. दरम्यान या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. या आंदोलनामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मंत्री अस्लम शेख, वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल हे सगळे उपस्थित होते.


Tags:    

Similar News