लोकसभेत मंगळवारी आरक्षण सुधारणा विधेयकावरुन काँग्रेसने मोदी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. राज्यांना आरक्षणाचा अधिकार देण्यासाठी घटना दुरूस्ती विधेयकावरील चर्चे दरम्यान काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारला घटना दुरूस्ती कऱण्याची वेळ का आली, असा सवाल उपस्थित केला. १०२व्या घटना दुरूस्तीमुळे राज्यांना आरक्षणाचा अधिकार राहिला नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर सरकारने आता घटना दुरूस्ती विधेयक आणून आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका चौधरी यांनी केली. तसेच काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले.
पण महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादेमुळे आरक्षण देण्याचा तिढा सुटणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादाही सरकारने काढावी अशी मागणी चौधरी यांनी केली. तसेच उ.प्रदेशशह काही राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हे घटना दुरूस्ती विधेयक आणले असल्याची टीकाही चौधरी यांनी लोकसभेत केली.