मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यामातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागच्या काही महिन्यापासून आपल्या जिवाची पर्वा न करता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी लढत होते. या आंदोलनादरम्यान राज्यातील वेगवेगळे नेते मंडळी मनोज जरांगे यांना भेटत होती, आरक्षण कुठल्या पध्दतीने देता येईल यासंदर्भात चर्चाही होत होत्या मात्र ही लढा पुढे चालूच राहिला. अखेर मुंबईत धडकलेल्या या मोर्चाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने केलेल्या मागण्या मान्य केल्या.
मनोज जरांगे पाटील यांच्या या विजयाचं सर्व स्थरातून कौतूक केलं जात असून वेगवेगळ्या नेत्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस जरांगे पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशाच शुभेच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले की, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असून आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे ते कधी मिळणार ते पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारुन घ्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पारदर्शकता येईल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.