चांद्रयान - ३ मोहिम यशस्वी करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन! – नाना पटोले
पंडित जवाहरलाल नेहरुंच्या वैज्ञानिक दृष्टीमुळेच भारत चंद्रावर.
चांद्रयान-३ च्या चंद्रावर यशस्वी लँडिंगने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. १४० कोटी भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असून सहा दशकांच्या प्रदीर्घ अवकाश कार्यक्रमाने आज आणखी एक मिशन यशस्वी केले असून संपूर्ण जगाला भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे दर्शन घडवले आहे. या उत्तुंग कामगिरीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे तसेच या मोहिमेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
आजचे यश हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. पंडित नेहरुजींनी विज्ञानाला महत्व देत देशाच्या विकासावर भर दिला म्हणूनच भारत चांद्रयानची ऐतिहासिक कामगिरी करु शकला. चांद्रयान- ३ मोहिम फत्ते करण्यात इस्त्रोचे सर्व शास्त्रज्ञ, अंतराळ अभियंता, संशोधक आणि सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या मेहनतीचे यश आहे, त्यांनी केलेल्या या ऐतिहासिक कार्याला मनापासून सलाम. २००८ मध्ये, जेव्हा मून इम्पॅक्ट प्रोब (MIP), चांद्रयान-१ मिशन, भारतीय राष्ट्रीय ध्वज घेऊन चंद्रावर उतरले तेव्हा भारत हा चंद्रावर वैज्ञानिक उपकरण उतरवणारा चौथा देश बनला होता. चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेने भारताने आपल्या वैज्ञानिक प्रगतीचे जगाला पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे सॉफ्ट-लँडिंग हे डॉ. होमी जे भाभा, डॉ. विक्रम साराभाई, डॉ. सतीश धवन, डॉ. मेघनाद साहा, डॉ. शांती स्वरूप भटनागर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि इतर अनेक दिग्गज शास्त्रज्ञांनी घातलेल्या पायावर उभा राहिलेले शिखर आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.