पूरग्रस्तांसमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
कोल्हापूर – राज्यातील कोकण, प.महाराष्ट्र या भागाला गेल्या दिवसात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. या भागात आलेल्या महापुराने हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी केली. याच दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पूरग्रस्त भागाच्या दौऱ्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. यावेळी चिखली या गावात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले. या भेटीची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.
"शाहूपुरी भागात दौऱ्यावर असताना अनेक नागरिकांशी संवाद साधला. या भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी हे सुद्धा तेथे आले असता पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांना सांगितल्या आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. तसेच या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची सुद्धा गरज असल्याने एक बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी सुद्धा केली. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे यावेळी उपस्थित होते."
राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते समोरासमोर आले होते. यावेळी दोघांमध्ये पुर परिस्थितीबाबत चर्चा देखील झाली. आता उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची मागणी मान्य करुन बैठक बोलावतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.