"आता कठोर निर्णय घ्यावे लागतील", मुख्यमंत्र्यांचे मोठ्या निर्णयाचे संकेत
राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसलेल्या महापुराच्या तडाख्यानंतर आता असे प्रकार टाळण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पूराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला त्यांनी भेट दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांन मोठा फटका बसला. त्यातच सांगली आणि कोल्हापूर शहरं पाण्याखाली गेली होती. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे तसेच भुसखलन होण्याचेही प्रकार घडले आहेत.
"अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर स्थानिक प्रशासनाने काही लाख नागरिकांचे स्थलांतर करून जीव वाचवले. पशुधनही त्याचप्रकारे वाचवण्यात आलं. महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं यास आमचं प्राधान्य आहे. हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जात आहेत, तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे." असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच " नद्या फुगल्यामुळे येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा आराखडा करून काम सुरू केलं जाणार आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्याबाबतीत काही उपाययोजना केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतिक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. या पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही." असे सांगत मुख्यमंत्र्यांनी येत्या काळात काही कठोर निर्णयांचे संकेत दिले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्त निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांशी संवाद साधला. तसेच शिवाजी पूल आणि पंचगंगा हॉस्पिटल येथे पूरग्रस्तांची त्यांनी विचारपूस केली. राज्य सरकारने अजून पूरग्रस्तांसाठी मदत पॅकेजची घोषणा केलेली नाही. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत जाहीर केली जाईल असा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची ५०% रक्कम तातडीने द्यावी. त्यांचे दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्याचे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे.