'तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात

Update: 2021-07-24 10:44 GMT

 तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. सरकारतर्फे गावकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल. गावकऱ्यांनी काळजी करू नये अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला. मुख्यमंत्र्यानी तळीये गावचा दौरा केला तेव्हा ते म्हणाले.

मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला. आजकाल पावसाळ्याची सुरुवातही चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगर- उतार व कडे-कपाऱ्यांतील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल. असं मुख्यमंत्री म्हणाले.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमधील मृतांची संख्या 60वर पोहोचले आहे. रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त मृतांचा आकडा 60 वर पोहचला,महाड तालुक्यातील तलई 49 आणि पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 49 मृतदेह आतापर्यंत आढळले आहेत. तर अनेकजण अजून बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या भागाला भेट दिली, तसेच इथल्या बचावकार्याची माहिती घेतली. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते, सकाळी लवकर हे शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी या गावातील 32 घरांवर दरड कोसळली होती. यामध्ये अनेकजऩ दबले गेले आहेत. यातील 49 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राज्य सरकारतर्फे या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांनी सर्व मदत आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची घोषणाही सरकारने केली आहे. स्थानिक यंत्रणा आणि NDRFच्या टीम या मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. यामुळे या भागात हाहाकार उडाला आहे. अऩेक ठिकाणांवरुन आता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना हलवण्यात येत आहे.

Tags:    

Similar News