तडे गेलेले स्लॅब, तुलटलेली गॅलरी... मुख्यमंत्र्यांना दिसले पोलिसांचे हाल

पोलीस वसाहतींच्या दूरवस्थेची कायम चर्चा होते, पण त्यांच्या घरांचा प्रश्न सुटत नाही, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरिवलीतील पोलीस वसाहतीमध्ये जाऊन पाहणी केली...यावेळी पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या समस्यांचा पाढाच वाचला....;

Update: 2022-07-27 09:41 GMT

मुंबईचे २४ तास रक्षण करणाऱ्या पोलिसांसाठी मुलभूत सोयी -सुविधा मात्र कमी असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते आहे. असाच एक प्रलंबित प्रश्न आहे पोलिसांच्या घरांच्या....सरकारतर्फे पोलिसांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या घरांच्या दूरवस्थेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि थेट पोलीस वसाहतीमध्ये जाऊन पोलिसांच्या घरांची पाहणी केली.

बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पहाणी केली. मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबईतील अनेक पोलीस वसाहतींची परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे, त्यात पोलिसांचे कुटूंबीय जीव मुठीत धरून जगत आहेत. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन पाहिली तसेच पोलिसांच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली. तसेच पोलीस वसाहतींच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीसांच्या वसाहतींबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितेल. तसेच यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.


Tags:    

Similar News