स्टंटबाजीसाठी आरोप करणाऱ्यावर यापुढे कारवाई करणार- एकनाथ शिंदे

संजय राऊत यांना मिळालेल्या जीव मारण्याच्या धमकी प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मात्र यापुढे कुणीही स्टंटबाजी करण्यासाठी आरोप केले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता दिला आहे.;

Update: 2023-02-22 13:36 GMT

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यानंतर त्य़ावर संजय राऊत यांनी दोन हजाराची डिल झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीव मारण्याची धमकी दिल्याचा सुद्धा गंभीर आरोप करत या संदर्भातील तक्रार पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र हे सर्व स्टंटबाजी करण्यासाठी कोणी करत असेल तर यापुढे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांचे नाव न घेता दिला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यामध्ये संजय राऊत यांचा सुद्धा समावेश होता. मात्र यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टंटबाजी करणाऱ्यांना सरकार अभय देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाी केली जाईल. राज्य सरकारकडे पोलिसांची एक समिती आहे जी सुरक्षेचा आढावा घेते आणि ज्यांना जशी सुरक्षेची गरज आहे, तशी सुरक्षा दिली जाते. परंतु जर कोणी स्टंटबाजीसाठी असे आरोप करत असेल तर त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

मात्र संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिली आहे की, समाजात सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे याची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. सुरक्षेचा विषय राजकारणाशी जोडणे चुकीचे असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी मांडले. संजय राऊत यांना प्रसिद्धीची सवल लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याची टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कुणाचेही नाव न घेता केली. 

Tags:    

Similar News