सफाई कामगारांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिवाळी साजरी ; कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण

Update: 2021-11-04 10:42 GMT

बीड :  बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मागील नऊ दिवसांपासून रोजंदारी मजूर सेनेच्या माध्यमातून महिला कामगार बेमुदत उपोषण करत आहेत, मात्र या उपोषणकर्त्या महिलांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

या महिला कामगार जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतमध्ये मागील 17 वर्षांपासून आपलं कर्तव्य बजावत आहेत. परंतु तरी देखील त्यांना किमान वेतन, पीएफ या सेवांपासून दूर ठेवले जातंय. एका महिला कर्मचाऱ्यांने आपला हक्क मागितल्याने तर या महिलेला बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळे संबंधित महिलेस पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे, किमान वेतन आणि सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात यावं. या प्रमुख मागण्यांसाठी मागील नऊ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. ऐन दिवाळीच्या दिवशीच या कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी झगडावे लागत आहे.

दरम्यान आपल्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच दिवाळी साजरी केली आहे. दरम्यान शासन प्रशासनाने तातडीने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महिला कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News