बिहारच्या संसदीय इतिहासात मंगळवारचा दिवस काळा दिवस ठरला आहे. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयक २०२१ वरुन हा सर्व गदारोळ झाला. या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. पण तरीही सत्ताधाऱ्यांनी या गदारोळात हे विधेयक मंजूर करुन घेतले. सामान्यांच्या अधिकारावर या विधेयकामुळे निर्बंध येणार आहेत, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर हे विशेष पोलीस विधेयक असून याचा सामान्य पोलिसांशी काही संबंध नाही, असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केला. विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली. संध्याकाळी साडे चारच्या सुमारास विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले, तसेच त्यांना सभागृहात जाता येऊ नये म्हणून मुख्य प्रवेश द्वाराला दोरीही बांधण्यात आली.
अखेर पोलिसांना पाचारण कऱण्यात आले आणि पोलिसांनी बळाचा वापर करत तिथून आमदारांना बाहेर काढले. यादरम्यान पोलिसांनी एका आमदाराला बाहेर फेकून दिल्याचा व्हिडिओ तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार संजीव यादव यांनी ट्विट केले आहे. यानंतर सभागृहात मंत्री अशोक चौधऱी आणि राजदचे आमदार चंद्रशेखर यांच्यात हाणामारी झाली. तर अध्यक्षांऐवजी सभागृहात आलेल्या प्रेम कुमार यांच्या हातातून विरोधकांनी विधेयकाची प्रत खेचून घेतली. आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहातील माईक, टेबलही फेकून दिले. पण या गदारोळात विधेयक मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या विधेयकाने सामान्यांना त्रास होणार नाही तसेच विरोधक अफवा पसरवत असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान राष्ट्रीय जनता दलाने सभागृहाबाहेरही रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केले. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलनही केले गेले. जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी दिली नसल्याने तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यांना ताब्यात घेण्यात आले.