'मी कुठेही पळून गेलेलो नाही, फरार झालेलो नाही'- किरण काळे

Update: 2021-09-06 07:03 GMT

अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती, दरम्यान अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे, फरार आहे. अशा अफवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कालपासून शहरात जाणीवपूर्वक पसरवल्या आहेत. मात्र मी कुठेही पळून गेलेलो नाही किंवा फरार झालेलो नाही.शिवाय खोट्या गुन्ह्याच्या बाबतीत मी अटकपूर्व जामीन घेणार नाही. असे स्पष्टीकरण शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे.

किरण काळे यांच्यावर अहमदनगर येथील आयटी पार्कमध्ये बळजबरीने घुसून दमदाटी करणं, येथील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर किरण काळे यांनी मी जामीन घेणार नाही म्हणत एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिला आहे. किरण काळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे काळे हे कट्टर समर्थक मानले जातात.

आयटी पार्कची प्रकरणात किरण काळे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे आमने-सामने आले असून पत्रकार परिषदेतून दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच अटकेच्या भीतीपोटी काळे यांनी शहरातून पळ काढल्याची चर्चा सुरू आहेत.मात्र याबाबत काळे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत खुलासा केला आहे.

किरण काळे यांनी म्हटले आहे की, माझे दैनंदिन कामकाज सुरू असून नागरिक, कार्यकर्त्यांच्या मी भेटीगाठी घेत आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, शहरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक यांचे असंख्य फोन मला येत आहेत. मी कोणत्याही भगिनीचा विनयभंग केलेला नाही. पोलिसांच्या सर्व कारवायांना सामोरे जायची आमची तयारी आहे. विरोधकांनी आमच्यावर राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला आहे. तपास कामी आम्ही सर्व सहकार्य करत आहोत, पोलिसांनी अटक केल्यास त्याला देखील सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. कारण आम्ही कायदा व सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेला मानणारे आहोत.

असं त्यांनी म्हटले आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण करून नगर शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा प्रकारचे "त्यांनी" यापूर्वी केले तसे नीच दुष्कृत्य काँग्रेस कार्यकर्ते कदापी करणार नाहीत. काँग्रेस कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीमध्ये एसपी ऑफिसवर हल्ला करणार नाहीत. पोलिसांनी मला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास अथवा अटक केली तरी जिल्हा पोलिस अधिक्षकांसमोरून मला काँग्रेस कार्यकर्ते पळवून देखील नेणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी देखील याबाबतीत निश्चिंत राहावे, असे म्हणत काळे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Tags:    

Similar News