वायू प्रदूषणाने गुदमरलेल्या नाशिकमध्ये केवळ एकच हवा गुणवत्ता तपासणी केंद्र
उद्योग आणि वीजनिर्मिती क्षेत्राचा नाशिकच्या एकूण वायू प्रदूषणात ७० टक्के वाटा आहे, राष्ट्रीय मानकांनुसार शहरात कमीत कमी २१ हवा तपासणी केंद्रे (एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन) असायला हवी असं असताना प्रत्यक्षात केवळ एकच केंद्र आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मंगळवारी नाशिकच्या नागरिकांसमोर मांडलं आहे.
शहरातील पर्यावरणवादी, अभ्यासक, संस्था, संघटनांचे प्रतिनिधीत्व करणारे साठहून अधिक लोक, नाशिकची हवा विषारी करणारे घटक जाणून घेणे व त्याबाबत चर्चा करणे यासाठी २९ जून रोजी जमले होते. राष्ट्रीय सेवा दल, मानव उत्थान मंच आणि वातावरण फाऊंडेशन यांनी ही बैठक आयोजित केली होती.
हवेच्या गुणवत्तेवर स्वतंत्रपणे संशोधन करणाऱ्या अर्बन एमिशन्सचे संस्थापक सरथ गुट्टीकुंडा यांनी यावेळी सांगितले की पीएम २.५ चा सर्वात मोठा स्त्रोत ६८ टक्के वाट्यासह उद्योग क्षेत्र (वीजनिर्मिती प्रकल्पांसह) आहे. त्यानंतर धूळ आणि वाहतूक क्षेत्राचा क्रमांक आहे. विश्लेषणात असंही दिसून आलंय की, या स्त्रोतांकडे वेळीच लक्ष्य दिलं नाही तर २०३० पर्यंत प्रदूषणाची पातळी अत्यंत धोकादायक पद्धतीने वाढत राहील.
शहरात सध्या केवळ एकच एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांनुसार नाशिकला कमीत कमी २१ मॉनिटरिंग स्टेशनची आवश्यकता आहे.
नाशिकच्या नागरिकांनी अधिक एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनची मागणी करणे तातडीने आवश्यक आहे. कारण त्यामुळे त्यांना ते दैनंदिन श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता जाणून घेण्यास मदत होईल. भविष्याची आखणी करायलाही त्याने मदत होईल, स्थानिक पातळीवर माहिती गोळा करणे आणि त्यासोबतच लवकरात लवकर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण धोरणाची आखणी करणे गरजेचं असल्याचं मत गुट्टीकोंडा यांनी सांगितलं आहे.
मानव उत्थान मंचाचे जगबीर सिंह म्हणाले, "लोक असे समजतात की नाशिक हे शहर टेकड्यांनी घेरलेले असल्यामुळे तसेच हिरवाई असल्यामुळे येथे प्रदूषणाची समस्याच नाहीये. परंतु जेव्हा २०१८ मध्ये नाशिक राज्यातले सहावे सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे जाहीर झाले, तेव्हा धोक्याची घंटा वाजली.
नागरी संस्थांचे अनेक कार्यकर्ते नाशिकच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र, सामान्य नागरिक नाशिकच्या स्वच्छ हवा कार्यक्रमाबाबत जागरुक नाहीत. आम्ही असे ऐकले आहे की, केंद्र सरकारने नाशिक शहरातील स्वच्छ हवेचे धेय्य गाठण्यासाठी शहरासाठी २० कोटी रुपये मंजूर केले आहेत, मात्र ते कोठे आणि कसे खर्च होत आहेत, याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत."
सिंग पुढे म्हणाले की संबंधित अधिकाऱ्यांनी नाशिकच्या स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि खर्चाची तरतूद याबाबत नागरिकांना अवगत करावे. आणि त्यावरील चर्चेत सहभागी करून घ्यावे.
राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन मते म्हणाले, "आजच्या बैठकीत आम्हाला वायू प्रदूषणाबाबत अनेक गोष्टी माहिती झाल्या व ही समस्या निवारण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे समजले. आम्ही आता नाशिक स्वच्छ हवा गट उभा करून सर्व हितसंबंधीत लोकांना एकत्र आणण्याचं नियोजन करत आहोत."
ए.सी.पी.एम. मेडिकल कॉलेजच्या रेस्पिरेटरी मेडिसीन विभागप्रमुख प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीत वायू प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट केले. पीएम२.५ सारखे सूक्ष्म कण शरिराच्या संरक्षण यंत्रणेला भेदून रक्तप्रवाहाच्या मार्गाने फुफुस व मेंदूसह इतर अवयवात प्रवेश मिळवतात व त्यांच्यावर वाईट परिणाम करतात. वायू प्रदूषणाचा प्रभाव प्रत्येक अवयवावर हळुहळू होत असतो. त्याचे दृश्य परिणाम दीर्घकाळाने लक्षात येतात, असे त्या म्हणाल्या.
वैद्यकीय पुराव्यांनी दाखवून दिले आहे की प्रदूषित हवेमुळे फुफुसाची क्षमता ६०-७० टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे सांगून डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की पुनरुत्पादन यंत्रणेवर होणाऱ्या परिणामामुळे गर्भवती महिला व गर्भाला असणारा धोका सर्वांत मोठा असल्याचे दिसून आले आहे. वायू प्रदूषणामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे कोविड-१९ ची लागण व होणारे मृत्यू याबाबत अधिक धोकादायक होऊ शकतो, असे आता स्पष्ट झाले आहे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
ऑनलाईन सेशनचे सूत्रसंचालन नितीन मते यांनी केले, तर पर्यावरण क्षेत्रात काम करणारे 'झटका'चे रोशन केदार, चंद्रकिशोर पाटील, भारती जाधव, छात्र भारतीचे उपाध्यक्ष समाधान बागूल, गुरुवर्य दादासाहेब बुवा शिक्षण संस्थेचे सचिव खरे आदी सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट म्हणाले, "मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई या प्रदूषण मानकांची पूर्तता न करू शकलेल्या महाराष्ट्रातील शहरांचे नागरिक स्वच्छ हवेची मागणी करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत. तसेच मंगळवारी नाशिकचे नागरिकही येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे म्हणून ही समस्या समजून घेण्यासाठी व वायू प्रदूषणाबाबत जागृती करण्यासाठी एकत्र आले आहेत. कृतीशील नागरिक गट आता स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत समग्र उपाय शोधण्या व योजण्याकरिता काम करण्यासाठी आग्रही आहेत."