मुंबईतला वीज पुरवठा खंडीत होण्यामागे चीनचा हात - ऊर्जामंत्री
मुंबईत गेल्यावर्षी झालेल्या वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडला होता. पण यामागे नेमके कोण होते याचा शोध लागल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली आहे.
गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत काही तासांसाठी वीज पुरवठा खंडीत झाला होता. पण या ब्लॅक आऊटमागे घातपात असल्याचे सिद्ध झाल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. यासंदर्भातला माहिती मिळाली सायबर सेलचा रिपोर्ट जाहीर केला जाईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले आहे. सायबर विभाग गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी हा अहवाल आपल्याला सादर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. हा हल्ला नेमका कसा केला गेला, कुणी केला याबाबतची सर्व माहिती अहवाल हातात आल्यानंतर दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.
१२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईसह आसपासच्या भागातील वीज पुरवठा काही तासांसाठी ठप्प झाला होता. ग्रीडमधील बिघाड याला कारणीभूत असल्याचे त्यावेळी सांगितले जात होते. पण यामागे घातपात असल्याचा दावा आपण तेव्हाही केला होता, पण आपल्याला वेड्यात काढले गेले अशी खंतही ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भातल्या एका अहवालाचा हवाला न्यूयॉर्क टाईम्सने दिलेला असून चीनच्या हल्ल्यामुळे मुंबईची वीज गेली असे त्यात म्हटले आहे. भारत आणि चीन दरम्यान गेल्यावर्षी लडाखमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर झालेल्या संघर्षात भारताचे काही जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने चीनची व्यापार कोंडी करत अनेक कंपन्या आणि एप्सवर बंदी घातली होती. भारतावर दबाव निर्माण कऱण्यासाठी चीनने हा सायबर हल्ला केला होता, अशीही चर्चा आता होऊ लागली आहे.