मोदी सरकारच्या मनसुब्यावर पाणी, नव्या CBI प्रमुखांच्या निवड समितीच्या बैठकीत सरन्यायाधीशांनी सुनावले खडे बोल

Update: 2021-05-25 04:45 GMT

सीबीआयच्या प्रमुख पदी कोणाची निवड करायची यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संध्याकाळी एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी एका नियमाचा उल्लेख केला. ज्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या यादीमधील दोन नावे यादीतून काढावी लागली आहेत. या संदर्भात NDTV ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.

९० मिनिटांच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या संपूर्ण पॅनलचे लक्ष हे महाराष्ट्रचे माजी डीजीपी सुबोध कुमार जैसवाल, सशस्त्र सीमा दलाचे डीजी केआर चंद्र आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्हीएसके कौमुडी यांच्या नावाकडे होते.

मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत मुख्य न्यायाधीश रमना यांनी "सहा महिन्यांच्या नियमांचा" उल्लेख केला, ज्याला सीबीआय प्रमुखाच्या निवडीदरम्यान नेहमी दुर्लक्ष केले जाते. न्यायमूर्ती रमना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आठवण करून देत, निर्णयानुसार ज्या अधिकाऱ्यांच्या नोकरीत सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असेल, त्या अधिकाऱ्यांना पोलिस प्रमुखपदासाठी मान्यता देता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान निवड समितीने या कायद्याचे पालन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. पॅनेलमधील विरोधी पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सुद्धा या नियमाचे समर्थन केले.

अधीर रंजन चौधरी यांनी यादीतील नावांबद्दल कोणतीही हरकत व्यक्त केलेली नाही. मात्र, असहमती व्यक्त करताना सरकारने उमेदवारांची यादी बनवताना "अनौपचारिक दृष्टीकोन" ठेवल्याचं त्यांनी म्हटलं. 'एकूण 109 नावे देण्यात आली होती. मात्र, 16 नावं बदलण्यात आली होती. सरन्यायाधीशांनी सांगितलं की 11 मेला मला 109 नाव देण्यात आली होती. आणि आज दुपारी 1 वाजता 10 नाव शॉर्ट लिस्ट करण्यात आली. तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 6 नाव राहिली. प्रशासनाची ही पद्धत चुकीची असल्याचं मत देखील सरन्यायाधीशांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान सरन्यायाधीश यांनी उपस्थित केलेल्या या नियमांमुळे ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार असलेले बीएसएफचे राकेश अस्थाना तसंच १ मे रोजी निवृत्त होत असलेले राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे वाय.सी. मोदी या दोघांनाही यादीतून बाहेर काढण्यात आलं आहे.

दरम्यान चार महिने उशिराने ही बैठक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. राकेश अस्थाना आणि वाय.सी. मोदी या दोघांचेही नाव यादीत वरती होते.

Tags:    

Similar News