जागतिक विश्वचष बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचलेला भारताचा स्टार बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानानंदा यानं आज सर्व क्रीडाप्रेमींची मनं जिंकलीय. अवघ्या १८ वर्षांच्या रमेशबाबूनं स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बुद्धिबळातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या मॅग्नस कार्लसनला शेवटपर्यंत विजयासाठी चांगलंच झुंजवलं. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल लागण्यासाठी तीन दिवसात ४ डाव खेळावे लागले. १८ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानानंदा Vs ३२ वर्षीय मॅग्नस कार्लसन या सामन्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र, आपला सर्व अनुभव पणाला लावून मॅग्नस कार्लसननं अखेर जागतिक बुद्धिबळाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. दुसऱ्या टायब्रेकरपर्यंत कार्लसननं आपला विजय निश्चित केला होता.
चेन्नईच्या १८ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानानंदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तेव्हापासूनच या अंतिम सामन्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा रमेशबाबू हा आजवरच्या इतिहासातला सगळ्यात लहान खेळाडू ठरलाय.