IPL2021: चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून केला पराभव; चेन्नई फायनलमध्ये
मुंबई : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या योगदानाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पराभव करत आयपीएल २०२१च्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. दुबईच्या मैदानावर हा रंगतदार सामना झाला. नाणेफेक जिंकलेल्या धोनीने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींमुळे दिल्लीने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऋतुराज -रॉबिनने ११० धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगल्या स्थितीत पोहोचवले, मात्र, दिल्लीच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत काही काळ चेन्नईला संकटात टाकले होते. शेवटच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दिल्लीला अजून एक संधी मिळणार आहे.
दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाने डु प्लेसिलला क्लीन बोल्ड करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डू प्लेसिसला केवळ एकच धाव करता आली.त्याच्यानंतर रॉबिन उथप्पा मैदानात आला. त्याने पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारत चौकार ठोकला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात चेन्नईने आपले अर्धशतक पूर्ण केले. १० व्या षटकात उथप्पाने अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईसाठी त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. १४व्या षटकात टॉम करनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात उथप्पा बाद झाला. उथप्पाने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. उथप्पानंतर चेन्नईने शार्दुल ठाकूरला फलंदाजीसाठी बढती दिली. याच षटकात ऋतुराजने अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईला विजयासाठी १२ चेंडूत २४ धावांची गरज असताना आवेश खानने ऋतुराजला बाद केले. ऋतुराजने ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार धोनी मैदानात आला. धोनीने ६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १८ धावा करत चेन्नईच्या विजय मिळवून दिला.