मी ही संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊत यांना टोला

संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं की मी ही कोल्हापुरचा आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.;

Update: 2022-02-22 01:58 GMT

गेल्या काही दिवसात राज्यात राजकीय धुमचक्री उडाली आहे. त्यातच भाजप विरुध्द शिवसेना वाद रंगला आहे. दररोज पत्रकार परिषदेतून नवनवे आरोप केले जात आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यावर अनेक नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसेच मी संजय राऊत यांच्यापेक्षाही भयानक बोलू शकतो, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

मी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळण्यासाठी तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते, त्या भाषेत आपण बोलतो, असे सांगितल्याचे एका पत्रकाराने सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरी भाषेचे उदाहरण आणि कोल्हापुर कनेक्शन सांगत संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली आहे, असे पत्रकाराने विचारल्यावर पाटील म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगरभाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वात भाजपाला पुर्ण बहुमत मिळाले, असे यावेळी पाटलांनी सांगितले.

पुढे पाटील म्हणाले, २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत एकुण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच, असा टोलाही पाटलांनी लगावला

काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावर संजय राऊतांनी पलटवार देखील केला. परंतु यातच त्यांनी दोन-तीन वेळा किरीट सोमय्यांना शिवी दिली होती. यावरून अनेक भाजपा नेत्यांनी संजय राऊतांच्या शिवराळ भाषेवर आक्षेप घेतला आहे.

Tags:    

Similar News