'ज्यांनी आमच्या जीवावर १८ खासदार निवडून आणलेत, ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्नं बघत आहेत' - पाटील

Update: 2021-12-08 13:13 GMT

मुंबई// "ज्यांनी आमच्या जीवावर १८ खासदार निवडून आणलेत, ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्नं बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. जे गेल्या दोन वर्षांमध्ये एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गना करू नयेत.", अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

सोबतच, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान पुन्हा होणे शक्य नाही. कोविड काळात केंद्र शासनाने परिस्थिती सक्षमपणे काम केलं. ममता बॅनर्जीही पंतप्रधान होऊ पाहात आहेत, तर शरद पवार यांचे नाव कायमच पंतप्रधान म्हणून समोर येते. पण, आगामी काळातही भारतीय जनता पार्टीच सत्तेत राहील." असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

फलटण येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,अनुप शहा उपस्थित होते.

दरम्यान पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला "संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करायला निघालेत, तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात." असा टोला पाटील यांनी लगावला.

Tags:    

Similar News