मला 'चंपा' म्हणाल तर….अजित पवारांना चंद्रकांत पाटील यांचं उत्तर
चंद्रकांत पाटलांचा चंपा असा उल्लेख करणाऱ्या अजित पवारांना आता चंद्रकांत पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे…. मला चंपा म्हणाल तर
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून समाधान अवताडे यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोनही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
करोनाच्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये प्रचार जोरात सुरु झाला आहे. पंढरपूरच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' असा उल्लेख केला होता.
यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत म्हटलं आहे की मला पुन्हा 'चंपा' बोललात तर याद राखा तुमच्या मुलापासून सर्वांचे शॉर्टफॉर्म करेन. असा सज्जड इशारा पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे. असं वृत्त टीव्ही9 च्या वृत्तवाहिनीने दिलं आहे.
अलीकडे शॉटफॉर्मची संकल्पना जोर धरू लागली आहे. राजकारणात एकमेंकांचे नाव शॉटफॉर्मने उच्चारणे सध्या महागात पडेल अशी स्थिती निर्माण होत आहे.
अजित पवार यांनी बुधवारी पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा 'चंपा' या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टीकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले.
दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा', असे विधान करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा अन्याय, दूराचार आणि भ्रष्टाचार रोखण्याची व हे सरकार चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे, ती दवडू नका,' असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. फडणवीसांच्या या टिकेला आज अजित पवार यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिले. 'राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही' असं म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ते पंढरपूर मधील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा प्रचार जोरात सुरु असताना राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यात कोरोनाचे ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. या दुसऱ्या लाटेत आज रोजी राज्यात एकूण ६,१२,०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.