राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट; रब्बी पिकांना धोका, बळीराजा चिंतेत
पुणे// मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं असून , याचा जबरदस्त फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
29/11;महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 Dec ला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. हि सिस्टिम येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सशी मिळून,त्याचा प्रभावी राज्यात काहि ठिकाणी 30 Nov-2 Dec मेघगर्जनेसह,जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता.काही ठिकाणी हलका पाऊस.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 29, 2021
-IMD pic.twitter.com/XFcrDQGH13
हवामान विभागाने पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
30 डिसेंबरपासून पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.