पुणे - बुधवार 10 जानेवारी दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ति चाळणी परीक्षेचा पेपर हा फुटल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका ए, बी, सी, डी, हे एकाच बंद पाकिटातून येणे नियमा मध्ये असतान 'सी ' आणि 'डी ' हे कोड असलेले प्रश्न पत्र हे दुसऱ्या पाकिटातून आले. आणि या संबंधित दोन्हीही कोड असलेल्या पेपरला सील नव्हते. प्रश्नपत्रिके वरील सूचना नंबर तीन मधील पॉईंट नंबर एक मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते पेपर सीलबंद नसेल तर विद्यार्थ्यांनी स्वीकारू नये. ही सूचना असताना पेपर सीलबंद पद्धतीने आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी तो स्वीकारला नाही. बराच वेळ उलटून देखील प्रशासनाकडून या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारे स्पष्टीकरण अथवा दुसरा पेपर देण्यात आला नाही. यामुळे हा पेपर फुटला असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
राज्यात ठिकठिकाणी झालेल्या सेंटरवर हा सेम प्रकार आढळून आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. विद्यापीठाच्या सीट विभागाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे पालन का केले नाहीत असा सवाल
विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. मात्र या वर स्पष्टीकरण देत असताना कोणत्याही प्रकारे पेपर फुटला नाही अशा आशयाचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केले आहे.
नियमानुसार व सूचनेनुसार पेपर सील बंद नसेल तर तो स्वीकारू नये अशी सूचना प्रश्नपत्रि के वर केलेली असते. सूचनेचे पालन करून विद्यार्थ्यांनी पेपर स्वीकारला नाही. यात विद्यार्थ्यांचे काय चुकले असा सवाल विद्यार्थ्यांनी सेट विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित करून काल मोठ्या प्रमाणामध्ये सारथी, बार्टी आणि महाज्योती कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आता पुन्हा परीक्षा नकोत सरसकट फेलोशिप द्या अशा पद्धतीच्या मागण्या आणि घोषणा या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.
सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थेअंतर्गत येणाऱ्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ति करिता चाळणी परीक्षेचे आयोजन याआधी 24 डिसेंबर रोजी करण्यात आले होते मात्र या परीक्षेमध्ये 2019 चा पेपर कॉपी-पेस्ट झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली होती आणि ती 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु या पेपरमध्ये देखील गोंधळ झाल्याने आता शासन काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.