महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल का ?

Update: 2021-05-01 16:57 GMT

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यासह पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकींचा निकाल उद्या 2 मेला जाहीर केला जाणार आहे. या 5 राज्यांच्या निवडणुकानंतर महाराष्ट्रात मिशन लोटस सुरु होईल अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

सध्या कोरोना महामारीने देशात हाहाकार माजला असला तरी भाजपने सत्ता मिळवण्यासाठी कशा पद्धतीने डावपेच आखत आहे. हे पूर्ण देशाने 5 राज्याच्या निवडणुकीनंतर पाहिले आहे. त्यामुळे या 5 राज्याच्या निवडणुकीनंतर 105 आमदार असलेल्या महाराष्ट्रात भाजप शांत राहिल का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

त्यातच महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीची लाच मागितल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे अनिल परब यांचं देखील प्रकरणात नाव घेतलं जात आहे. त्यामुळं भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांवर दबाव निर्माण केला आहे. हे वेगळं सांगायला नको.

त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबूक लाईव्ह नंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे देवेंद्र फडणवीस देखील शांत आहेत. फक्त फडणवीसच नाही तर पूर्ण भाजप नेते शांत आहेत. त्यामुळं भाजप या 5 राज्याच्या निवडणुकानंतर मिशन लोटस साठी प्रयत्न करेल. यात कुठलीही शंका नाही.

जर भाजपने मिशन लोटस साठी प्रयत्न केले नाही तर भाजपचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता घटत असून उद्धव ठाकरे यांना लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. ही बाब 'हिंदू व्होट बॅक' असणाऱ्या भाजपला धोकादायक आहे. कारण भाजप आणि शिवसेना यांचा मतदार हा समविचारी आहे. त्यामुळं भाजपचा मतदानाचा टक्का घटू शकतो.

एकंदरीत या सर्व मुद्द्याचा विचार करता महाराष्ट्रात मिशन लोटस सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags:    

Similar News