दुर्दैवी : वेळेवर पगार न झाल्याने बस चालकाची आत्महत्या

Update: 2021-10-12 11:31 GMT

बीड : बीड आगारातील कर्मचा-याची पगार वेळेवर न झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बीड शहरातून समोर आली आहे. महिन्याच्या ७ तारखेला कर्मचाऱ्यांची पगार होत असते, परंतु गेल्या काही महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने येथील अनेक कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे यातील एका वाहन चालकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

बीड आगारातील वाहन चालक तुकाराम सानप असं या चालकाचे नाव असून यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी आणि बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. सोमवारी दिवसभर नियोजनानुसार बसच्या फेऱ्या केल्या होत्या. घरी गेल्यानंतर त्यांनी बीड शहरातील अंकुश नगर इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत तुकाराम सानप यांच्या घरची लाईट गेल्या १५ दिवसापुर्वी कट केली होती. त्या बरोबरच घरातील किराणा संपला होता, यासह इतर कारणांमुळे तुकाराम सानप यांनी आत्महत्या केली. काम करुन सुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नसतील तर संबंधित मंञी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी बस कर्मचारी करत आहेत.

Tags:    

Similar News