BRS भाजपची नाही तर सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बी टीम- हरिभाऊ राठोड
बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. बीआरएस भाजपची बी टीम असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. पण आम्ही भाजपची नाही तर तुमची बी टीम असल्याचे वक्तव्य बीआरएसचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केले आहे. नेमकं काय म्हणालेत हरिभाऊ राठोड जाणून घेऊयात...;
केसीआर यांच्या बीआरएसने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे केसीआर भाजपची बी टीम असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याला बीआरएसचे नेते हरिभाऊ राठोड यांनी उत्तर दिले आहे.
संजय राऊत, मल्लिकार्जून खर्गे, नाना पटोले आणि शरद पवार हे केसीआरला भाजपने महाराष्ट्रात आणल्याचे म्हणत आहेत. पण केसीआरला भाजपने नाही तर राज्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आणले आहे. एवढंच नाही तर बीआरएसच्या महाराष्ट्रातील एन्ट्रीमुळे भाजप धास्तावले आहे. कारण बीआरएस भाजपच्या 105 जागांपैकी 50 जागा जिंकणार आहे. त्यामुळे बीआरएस हा पक्ष भाजपची बी टीम नसून ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची बी टीम आहे, असं मानायला हवं. कारण भाजपच्या जागा कमी होणार असतील तर त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा हा महाविकास आघाडीलाच होणार आहे. त्यामुळे बीआरएस महाविकास आघाडीची बी टीम असल्याचं म्हणावं लागेल.