जळगावात भर दिवसा SBI बँकेत दरोडा, मॅनेजरवर वार, मॅनेजर आणि कॅशियरचे मोबाईल घेऊन फरार
जळगावात भरदिवसा स्टेट बँकेवर दरोडा टाकला आहे. कर्मचाऱ्यांना डांबून चोरट्यांनी केलेला कारनामा पहा प्रत्यक्ष
जळगावात भर दिवसा SBI बँकेत दरोडा, मॅनेजरवर वार, मॅनेजर आणि कॅशियरचे मोबाईल घेऊन फरार
जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेवर आज भरदिवसा सशस्त्र दरोडा पडलाय. या घटनेत 17 लाख रुपयांची रोकड तसेच तिजोरीतून सोने चोरट्यांनी लांबवल्याची माहिती आहे. मॅनेजरची गाडी, कॅशियर व मॅनेजरचा मोबाईलदेखील चोरट्यांनी चोरून नेलाय.
दुचाकीवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी चोरट्यांनी हा दरोडा टाकल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी 9 ते साडेनऊ दरम्यान ही घटना घडलीय. दरोडेखोरांच्या हातात शस्त्र होती, शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांकडून रोकड लांबवली आहे. मॅनेजर तसंच सुरक्षा रक्षकावर चाकूने वार केले असून तीन कर्मचाऱ्यांना चोरट्यानी बँकेत बांधून ठेवलं होतं. चोरट्यानी रोकड सोबतच तिजोरी खोलून सोनंही चोरले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा ताफा दाखल झाला. पोलीस घटनेची माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या दरोड्याच्या घटनेने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. बँकेतून चोरट्यानी मोठी रक्कम व सोने लांबवलं आहे परंतु पोलीस तपासानंतर लुटीचा नेमका आकडा कळेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिलीय.