नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, ब्रेक द चेन अभियान कसं यशस्वी होणार?
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला आहे. सार्वजनिक राजकीय कार्यक्रमास बंदी असताना भव्य कार्यक्रम घेण्याचा मोह शिवसेना नेत्यांना आवरला नाही. कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कोणतेही नियम पाळले गेले नाही. आणि कुठलंही सामाजिक अंतर पाळण्यात आले नाही.
एकीकडे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः वारंवार जनतेला आवाहन करत आहे. तर दुसरीकडे मात्र, त्यांचेच मंत्री कार्यकर्ते सार्वजनिक कार्यक्रम घेऊन नियमांना हरताळ फासत आहेत.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड मध्ये 500 बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात विद्यमान मंत्र्यासह माजी मंत्री उपस्थित होते. कोविड सेंटर मुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, याच कार्यक्रमात हजारहून अधिक नागरिक असल्यानं हे ठिकाण कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याशिवाय राहणार नाही. अशी शक्यता व्यक्त केली जात असून कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनाचे कार्यक्रम थांबवण्यात यावेत अशी मागणी आता नागरिक करत आहेत. कारण या उद्घाटन कार्यक्रमात मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहेत