Truecaller द्वारे वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर झाल्याचा आरोप, हायकोर्टाची केंद्र आणि राज्याला नोटीस
Truecaller Appने वापरकर्त्यांची माहिती परस्पर इतरांना शेअर केल्याचा धक्कादायक आरोप करणारी एक जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. शशांक पोस्तुरे आणि मानसी पोस्तुरे तसेच बिस्मा मुल्ला या लॉ च्या विद्यार्थ्यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने याचिकाकर्त्यांचे सर्व म्हणणे जाणून घेतल्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि NCPI यांना नोटीस बजावली आहे.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?
याचिका दाखल करणारे लॉ चे विद्यार्थी आहेत. शशांक आणि मानसी पोस्तुरे तसेच बिस्मा मुल्ला अशी त्यांची नावे आहेत. . Truecaller Appच्या लाखो वापरकर्त्यांचा डाटा बेकायदेशीररित्या गोळा केला जात आहे, त्यामुळे तातडीने यावर कारवाईची गरज आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. अशाप्रकारे डाटा गोळा केला गेला तर त्याचा परिणाम देशाच्या सुरक्षेवर होऊ शकतो. तसेच वापरकर्त्यांच्या खासगीपणाच्या मुलभूत अधिकारावर यामुळे गदा येत आहे, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, वापरकर्त्यांचा आर्थिक डाटा म्हणजे बँक अकाऊंट डिटेल्स, क्रेडीट/डेबिट कार्ड किंवा UPI डिटेल्सही Truecaller ने शेअर केले आहेत. एवढेच नाही तर वापरकर्त्यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांची नोंदणी UPIवर केली गेल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. ICICI बँकेत ज्या वापरकर्त्यांचे खाते आहेत त्यांचे UPI ID Truecaller ने परस्पर बनवून टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. Truecaller ने वापरकर्त्यांचे Geo-location, IP address, device ID आणि ब्राऊझिंग हिस्ट्री ही सर्व माहिती बेकायदेशीर रित्या गोळा केल्याचा आरोप कऱण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यामूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. जी.एस.कुलकर्णी यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, National Payment Corporation of India (NPCI) आणि ICICI बँक यांना नोटीस बजावली आहे.
Truecaller चे म्हणणे काय?
या सर्व आऱोपांचे Truecallerने खंडन केले आहे. एवढेच नाही तर याचिकाकर्त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत असाही दावा कंपनीने केला आहे. एवढेच नाही तर आमचे मोबाईल एप हे डाटा प्रायव्हसी कायद्याचे तंतोतंत पालन करत आहे. कंपनीने काय म्हटले आहे ते पाहूया..
"आमच्या तमाम Truecallerवापरकर्त्यांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांचा सर्व डाटा सुरक्षित आहे. वापरकर्त्यांचा कोणताही डाटा Truecaller शेअर करत नाही आणि विकतही नाही. आमच्या वापरकर्त्यांच्या डाटाची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की, आमच्या प्रायव्हसी पॉलिसीप्रमाणेच आम्ही वापरकर्त्यांचा डाटावर प्रक्रिया करत असतो. "