:कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज निर्णय होणार आहे. मलिक यांनी आपली अटक ही बेकायदा असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आज सकाळी १०.३० वाजता न्यायालय आपला निकाल देईल.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयात मलिक यांची बाजू अॅड. अमित देसाई यांनी मांडली. तर ईडीकडून मलिक यांची अटक ही कायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आज निकाल जाहीर करणार आहे.
मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक करून आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केलं होतं. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. तसेच नंतर मलिक यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.ईडीने मलिक यांची अटक कायदेशीर असल्याचा दावा उच्च न्यायालयात केला. मलिक यांनी अटकेला आव्हान देण्याऐवजी नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे मत ईडीने न्यायालयामोर मांडले. त्याचबरोबर मलिक यांची याचिका सुनावणी योग्य नसल्याचा दावा करत ती फेटाळण्याचीही मागणी ईडीने उच्च न्यायालयासमोर केली होती.
घटनाक्रम आर्यन खानची अटक ते नवाब मलिकांची अटक
2 ऑक्टोबर 2021- NCB ने कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला. या ठिकाणी होणारी रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज पार्टी त्यांनी उधळून लावली. त्यावेळी एनसीबीने आर्यन खान, त्याचा खास मित्र अरबाझ मर्चंट याच्यासहीत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं.
3 ऑक्टोबर 2021- समीर वानखेडे हे एनसीबीनेच विभागीय संचालक आहेत त्यांनी आर्यन खानला ताब्यात घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर काही वेळातच्या ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आणि सेवन केल्याप्रकरणी आर्यन खानसहीत आठही जणांना अटक करण्यात आली.
6 ऑक्टोबर 2021- शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यापासून पुढील चार दिवस या प्रकरणी फार कुणीही भाष्य केलं नव्हतं. मात्र, सहा ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी या सगळ्या प्रकरणात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन NCB ची कारवाई कशी बोगस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. केपी गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्याबाबतची माहिती जाहीर करत मलिकांनी या सगळ्या प्रकरणात पहिल्यांदाच भाजपचं नाव घेतलं. कारण मनिष भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी होता.
9 ऑक्टोबर 2021- 9 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आणखी एक गंभीर आरोप केला. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आर्यन खानसोबतच रिषभ सचदेवा यालाही क्रूझवरुन अटक करण्यात आली होती. रिषभ सचदेवा हा भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज ऊर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे. रिषभला अटक केल्यानंतर भाजपची सूत्र हलली आणि या तिघांना सोडून देण्यात आलं. आर्यन खान प्रकरणात भाजप कशा प्रकारे सक्रीय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न नवाब मलिक हे यावेळी सातत्याने करत होते.
16 ऑक्टोबर 2021- या सगळ्या प्रकरणात नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप केला होता की, समीर वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट छापे मारते. असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे आणि फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीचे फोटो शेअर करुन काही खंडणीसंबंधीचे काही सवालही उपस्थित केले होते.
28 ऑक्टोबर 2021- कोर्टाने प्रदीर्घ सुनावणीनंतर आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. ज्यानंतर नवाब मलिक यांनी 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!' असं एका ओळीचं ट्विट केलं होतं. त्यानंतरही त्यांनी आपल्या पत्रकार परिषदांचं सत्र सुरुच ठेवलं होतं.
31 ऑक्टोबर 2021- 'समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच आहेत. बोगस दाखला दाखवून समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवली. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे की ते जन्माने मुस्लिम आहेत.' असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
1 नोव्हेंबर 2021- नवाब मलिक यांनी 1 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी जे गाणं केलं होतं त्यावर आक्षेप घेतले होते. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. नवाब मलिक यांनी यावेळी ट्विटरवर काही फोटो शेअर केले होते. यात जयदीप राणाचाही फोटो होता. जयदीप राणाला ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली असून, त्यावरून मलिकांनी थेट फडणवीसांना ड्रग्ज पेडलरसोबत कनेक्शन असल्याचा आरोप केला होता.
1 नोव्हेंबर 2021- 'दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आवाज नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. यापाठीमागे त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता खरा बॉम्ब हा मी दिवाळीनंतर फोडणार.' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
5 नोव्हेंबर 2021- दुसरीकडे आर्यन खान प्रकरणात NCB ची प्रतिमा फारच मलीन झाली होती. त्यामुळे 5 नोव्हेंबर 2021 रोजी एनसीबीचे तत्कालीन झोनल हेड समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह पाच केसेसची चौकशी करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले.
7 नोव्हेंबर 2021- 7 नोव्हेंबर 2021 रोजी नवाब मलिक यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला होता की, 'आर्यन खानचं अपहरण करून खंडणी वसुलीचा भाजपच्या मोहित कंबोजने कट रचला होता. समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांचे चांगले संबंध आहेत. आर्यन खानला अडकवायचं, त्या बदल्यात 25 कोटी रूपये मागायचे.'
9 नोव्हेंबर 2021- नवाब मलिक यांनी 1993 च्या स्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान या दहशतवाद्याकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. या सगळ्यात मोठा अपहार झाला होता. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांवर केला होता.
9 नोव्हेंबर 2021- देवेंद्र फडणवीस बॉम्ब फोडणार होते अशी त्यांनी गर्जना केली होती. मात्र आज त्यांची पत्रकार परिषद मी पाहिली त्यांचे सगळे फटाके भिजलेले निघाले. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. मी कोणत्याही बॉम्बस्फोटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीकडून कवडी मोल दराने जमीन खरेदी केलेली नाही. असं स्पष्टीकरण तात्काळ नवाब मलिक यांनी दिलं होतं.
23 फेब्रुवारी 2022- या आरोप-प्रत्यारोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुढे काहीही फारसं भाष्य केलं नव्हतं. मात्र, (23 फेब्रुवारी 2022) पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक मलिकांच्या घरी धाड मारली आणि तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर जमीन खरेदी-विक्री प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.
दाऊदच्या भावामुळे नवाब मलिक सापडले ईडीच्या जाळ्यात?
2017 साली इक्बाल कासकर, अनिस इब्राहिम, आणि दाऊद इब्राहिम यांच्याविरोधात ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकरला अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली होती
15 फेब्रुवारी 2022- दाऊद इब्राहिमविरोधात नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीनंतर ईडीने 14 आणि 15 फेब्रुवारीला मुंबईतील अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. यावेळी ईडीची एक टीम हसीना पारकर हिच्या घरी देखील पोहचली होती. इथे ईडीच्या टीमने काही कागदपत्रं देखील तपासली होती.
17 फेब्रुवारी 2022- ईडीने छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला देखील चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. सलीम फ्रुटने काही काळापूर्वी पाकिस्तानला जाऊन आल्याची ईडीला माहिती मिळाली होती. तसेच भेंडी बाजारात चालत असलेल्या एका गँगसाठी सलीम फ्रुट काम करत असल्याचंही ईडीला समजलं होतं.
18 फेब्रुवारी 2022- ईडीने जी कागदपत्रं ताब्यात घेतली त्या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने (NIA) नुकताच गुन्हा नोंदवला होता या प्रकरणाच्या आधारे ईडीने देखील मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.
18 फेब्रुवारी 2022- भारतीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. एनआयएच्या तपासात काही दिवसांपूर्वी असं समोर आलं होतं की, दाऊद इब्राहिम याने एक ग्रुप तयार केला आहे. ज्यामध्ये मुंबई किंवा देशाच्या दुसऱ्या भागात कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याची तयारी होती. त्यात खूप लोकांशी संपर्क केला होता. त्यानंतर एनआयएने याप्रकरणी एक एफआयआर दाखल केली होती.
18 फेब्रुवारी 2022- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे कारागृहातून ED ने ताब्यात घेतलं आहे.
21 फेब्रुवारी 2022- मनी लाँड्रिंगप्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली शाह पारकर याची ईडीने चौकशी केली. हसीना पारकरच्या घरातून मिळालेल्या कागदपत्रांच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी अली शाह याला ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं.