Bangalore : बंगळुरूमधील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला. या घटनेत कॅफेचे ३ कर्मचारी आणि २ ग्राहकांसह ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बॉम्बस्फोटाला दुजोरा दिला आहे. हा कमी तिव्रतेचा स्फोट असल्याचे त्यांनी सांगितले. एका अज्ञात व्यक्तीने कॅफेमध्ये बॅग सोडली, आणि स्फोट झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथक, फॉरेन्सिक आणि एनआयएची टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली. पोलीसांनी सांगितले की, आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा कॅफेच्या भिंतीवरील काच फुटून टेबलावर विखुरली होती. व्हाईटफिल्ड फायर स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना कॅफेमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार कॅफेच्या स्फोटाच्या ठिकाणी बॅटरी, एक जळालेली बॅग आणि काही ओळखपत्रे सापडली आहेत. त्याआधारे बॉम्बस्फोटाचा कट असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणाले की, बसण्याच्या जागेत स्फोट झाला तेथे सिलिंडर नव्हता. या प्रकरणाचा पुढील तपास सूरू आहे.