कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरीकांना बंद असलेली मुंबई लोकल सेवा आता १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
आज सकाळपासून मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी सुरु करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात प्रवासी आणि मुंबई मनपा कर्मचाऱ्यांमधे ताळमेळ दिसून येत नव्हता. लसीकरण प्रमाणपत्राची झेरॉक्स आणि ओळखपत्र तपासून लसीकरण प्रमाणपत्रावर शिक्के दिले जात आहेत. त्यानंतर रेल्वे काऊंटरवरुन मासिक पास दिला जात आहे.
ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. आज पासून पास दिले असले तरी प्रवास १५ ऑगस्टनंतरच करता येईल असे मनपा आणि रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.