मुंबईच्या भायखळा प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या ( penguins ) देखभालीच्या खर्चावरून गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तब्बल 15 कोटी रुपयांचा पेंग्विनच्या देखभालीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. 24 नोव्हेंबरला स्थायी समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे यावरून आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शनला (Messrs Highway Construction) सप्टेंबर 2018 मध्ये पेंग्विन एन्क्लोजरच्या देखभालीसाठी तीन वर्षांसाठी 11.5 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या वर्षी 30 सप्टेंबर रोजी कराराची मुदत संपल्यानंतर, बीएमसीने 1 ऑक्टोबरपासून त्याच कंत्राटदाराला 43 दिवसांसाठी 45 लाख 84 हजार रुपये देऊन मुदतवाढ दिली होती.
आता पुन्हा एकदा प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी पुढील तीन वर्षांसाठी 15.26कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल ( Iqbal Singh Chahal ) यांनी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. विशेष म्हणजे देखभालीची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच कंत्राटदाराकडे देण्याची तयारी सुरू आहे. याच खर्चात 7 पेंग्विन आणि त्यांच्या दोन मुलांची देखभालही ठेकेदार करणार असल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत नवीन पेंग्विनचे बाळ जन्माला आल्यास कोणतीही अतिरिक्त रक्कम दिली जाणार नाही असेही उल्लेख करण्यात आला आहे. तर गेल्यावेळी देण्यात आलेल्या मुदतवाढीनंतर भाजपसोबतच कॉंग्रेसकडून सुद्धा विरोध करण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा पेंग्विनच्या खर्चावरून वाद होण्याची शक्यता आहे.
पेंग्विनवर आतापर्यंत झालेला खर्च
सुरवातील पेंग्विन खरेदी आणि त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
त्यांनतर 11 सप्टेंबर 2018 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत 11 कोटी 46 लाखांचे कंत्राट देण्यात आले.
मुदत संपल्यानंतर कराराला 43 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली, त्यावर अतिरिक्त 45 लाख 84 हजार रुपये खर्च झाले.
आता पुढील तीन वर्षांच्या देखभालीसाठी 15.26 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे.