भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गोवा दौऱ्यावर ; दोन दिवसीय दौऱ्यात घेणार तयारीचा आढावा
गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे, भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज दि. 20 रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर गोव्यात असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी ते चर्चा करतील.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी तसेच पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हे देखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. तर सहप्रभारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश या गोव्यात दाखल झाल्या आहेत.
आगामी चार पाच महिन्यात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावाही घेण्यासाठी पक्षाचे प्रभारी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हे सर्व नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्रीमंडळातील त्यांचे अन्य सहकारी, भाजप आमदार, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार आहेत. सोबतच भाजप युवा आघाडी, ओबीसी विभाग महिला मोर्चा, , अल्पसंख्यांक विभाग आदी आघाड्यांबरोबरच बूथ स्तरावर देखील ते संवाद साधतील.
फडणवीस यांनी बिहार विधानसभेत निवडणूक प्रभारी म्हणून भाजपसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. याआधी देखील ते अनेकदा निवडणुकांच्यावेळी गोव्यात आलेले आहेत आणि निवडणुकीची जबाबदारीही निभावली आहे. त्यांचा हा अनुभव गोवा भाजपला उपयोगी पडेल, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.