धुळे जिल्ह्यात काँग्रेसचे जनसंवाद यात्रेला सुरूवात झाली आहे. आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे. भारतीय जनता पक्षाच्या घृणास्पद आणि लोकशाहीविरोधी राजकारणाचा जनतेला अक्षरशः उबग आला आहे. असे प्रकार राज्यातील सुसंस्कृत जनतेला मान्य नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता जाणे अटळ आहे, असा वक्तव्यचं काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी केलंय.
धुळे परिसरात आज जनसंवाद यात्रेच्या दुसऱ्यादिवशी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसतर्फे नकाणे गावात जनसंवाद यात्रा काढण्यात आली. त्याचे नकाणे गावातील नागरिकांनी या जनसंवाद यात्रेचे उत्साहात स्वागत केले. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपवर जोरदार टिका केली. काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आणि राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विरोधक चांगलेच हादरले आहेत. त्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता देशासह राज्यात लोकसभा व विधानसभेत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील म्हणाले की, देशात सरकारच्या दडपशाहीमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, शेतीमालास भाव नाही, जातीय तेढ निर्माण करणे, विरोधकांचा आवाज दाबून लोकशाही- संविधान संपविण्याचे कटकारस्थान आदींमुळे जनतेच्या मनात भाजपा सत्ताधाऱ्यांविषयी चीड निर्माण झाली आहे. जनतेच्या मनातील भिती दूर होण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. आणि या जनसंवाद यात्रेला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.