जळगाव - भाजपच्या खासदार ऱक्षा खडसे यांच्याबद्दल पक्षाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह शब्द वापरला गेल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याच पोस्टला रिट्विट करत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याच्या महिला खासदाराबाबत भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह शब्द असल्याबाबत टीका केली आणि कारवाईचा इशाराही दिला आहे. पण आता रक्षा खडसे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या महिलेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणे अयोग्य आहे, या शब्दात गृहमंत्र्यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली.
"भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेला प्रकाराची माहिती मला समजल्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. माझ्याकडे व्हाट्सएपवर याबाबत जे काही स्क्रिनशॉट आलेत, त्यात हा प्रकार 'सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी' नावाने असलेल्या पेजवरून व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. तसेच हे व्हायरल स्क्रीनशॉट पाहिल्यानंतर आपण पक्षाची वेबसाईट तातडीने पाहिली पण त्यावर असे काही नव्हते. त्यामुळे वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढून त्यात एडिटिंग करुन पोस्ट व्हायरल केल्याचा संशय येतोय असेही त्यांनी सांगितले. या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरू आहे." त्यातून सत्य बाहेर येईल असेही रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.