मातंग समाजाची वर्गवारी करून अ, ब, क, ड नुसार स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. या मागण्यांसाठी बुधवारी भाजप आमदार सुनिल कांबळे आणि आमदार नामदेव ससाणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर निदर्शन केली. या दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.
या संदर्भात आम्ही या आमदारांशी बातचीत केली. यावेळी आमदार ससाणे यांन सांगितले की, मातंग समाज हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वास्तव्यास आहे. या समाजातील बहुतांशी नागरिक भूमिहीन असून, मोलमजुरी करून आपले जीवन जगत आहे. उच्च शिक्षणापासून हा समाज वंचित आहे. तसेच शासकीय सेवेत देखील या समाजातील युवकांची संख्या अत्यंत अल्प आहे. शासनाने त्यांच्या मागण्या व प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना मांडले.
काय आहेत मागण्या?
- लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करण्यात याव्यात.
- मातंग समाजात अ, ब, क, ड अनुसार वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षण त्वरीत लागू करावे.
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.
- आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी पुणे जिल्हा येथे भव्य स्मारक करण्यासाठी शासकीय पातळीवर लवकरात लवकर प्रयत्न करून स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे.
- मुंबई विद्यापीठास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी शासनाने त्वरित मंजुरी द्यावी.
- गंजपेठ पुणे येथील देशातील पहिली व्यायाम शाळा सुरू करून तेथे अनेक क्रांतिकारक घडविणाऱ्या लहुजी वस्ताद यांच्या क्रांती शाळेत लहुजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे.
- लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे.
- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्ज प्रकरण त्वरित सुरू करावे.
- अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थकीत कर्ज माफ करावे.
मातंग समाजाच्या या सर्व मागण्यांवर शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी या आमदारांनी केली आहे.