घोटाळ्यांच्या महामेरुंचा घोटाळा उघड करणार, मुंबै बँकेच्या चौकशीनंतर प्रवीण दरेकरांचा इशारा

Update: 2021-09-23 09:46 GMT

मुंबै बँकेतील घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे, अशी टीका मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तरीही बॅंकेच्या विरोधातील कुठल्याही चौकशीला कायदेशीर मार्गाने उत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहेय राज्य सरकराच्या विरोधात विविध प्रकरणात आरोप आणि टीका केल्यामुळेच सरकारने केवळ सुडाने व द्वेषापोटी कारवाईचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. परंतु विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारने कितीही आकसापोटी कारवाई केली तरी आमचा आवाज सरकार दाबू शकत नाही. जितका आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल तितक्याच जोमाने पुन्हा आम्ही आमचा आवाज उठवू, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

तसेच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची रीतसर तक्रार सर्व तपास यंत्रणाकडे आम्ही करणार आणि महाराष्ट्रातील घोटाळ्याच्या महामेरूंचा घोटाळा उघड करणार आहोत. त्यामुळे आमचा आता एककलमी कार्यक्रम सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हाच आहे", असेही दरेकर यांनी म्हटले आहे.

"मुंबै जिल्हा बॅंकेची यापूर्वीच सहकार कायद्याच्या कलम ८३ व ८८ ची चौकशी झाली आहे. त्याचा कम्पलायन्स रिपोर्ट देण्यात आला आहे. तो रिपोर्ट सहकार खात्याने स्वीकारला सुध्दा आहे. तसेच यासंदर्भात जी केस होती ती सी समरी म्हणून दाखल झाली. परंतु आता आमच्या विरोधात काहीच मिळत नाही व प्रविण देरकर विरोधी पक्ष नेते आहेत, मुबै बँकेचे अध्यक्ष आहेत. तसेच सरकारच्या विरोधात ते ज्या पध्दतीने विविध विषयावर टीका व आरोप करतात, त्यामुळे त्यांना कुठल्या चौकशीच्या फे-यात अडकविता येते का यासाठी हा एक केविलवाणा व दुर्दैवी प्रयत्न आहे," असा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

Tags:    

Similar News