सर्वांचे लक्ष लागून असलेला पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा आज भगवान गडाच्या पायथ्याशी साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, याच वेळी त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा राजकणात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.
यंदाचा मेळावा झाला ते जाऊ द्या, पुढच्या वर्षी आपण सर्व रेकॉर्ड तोडू. एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे. असे विधान यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं. विशेष म्हणजे दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिवसेना गेल्या कित्येक वर्षांपासून भरवत आहे. आता पंकजा मुंडे यांनी पुढच्या वर्षी शिवाजी पार्क भरवायचं असल्याचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. त्यातच पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याचा चर्चा सुरू असताना हे विधान मोठं समजले जात आहे.
पंकजा मुंडे यांनी यावेळी नेहेमी प्रमाणे आपल्या विरोधकांवर सुद्धा निशाणा साधला. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण मला आत जायचं माहितीये, तसंच बाहेर येणंही माहितीये, असं म्हणत आपल्याविरोधात राजकारण सुरू आहे, मात्र मी खंबीर आहे, असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं. माझं राजकारण संपल्याचा अपप्रचार करण्यात आला. पण मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.