घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीफ यांना तुरूंगात पाठवणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे, असं म्हणत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबत कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याचवेळी किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा तिसरा आरोप करण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुरगूडमध्ये किरीट सोमय्या यांना कोणताही विरोध करणार नाही असे मुरगूड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी म्हटले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देणार असल्याचे म्हटले आहे, सोबतच गर्दी टाळण्यासाठी मुरगूडचा आजचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे.