तहसीलदार ज्योती देवरे यांच्या जिवंत वेदनांची किंमत सरकारला नाही हे दुर्दैव !- वाघ
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज चित्रा वाघ यांनी पारनेर येथे तहसीलदार देवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील महिलांच्या समस्यांना वाचा फुटली आहे. या प्रकरणामुळे देवरे संपलेल्या नाहीत, त्या जिवंत आहेत मात्र त्यांच्या जिवंत वेदनांची किंमत राज्य सरकारला कळली नाही. त्यांची विचारपूस करून दोन वाक्य बोलण्याची सुबुद्धी सरकारला मिळाली नसल्याचे सांगतानाच या मुद्द्यावर नगर जिल्ह्यातील नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलतील अशी अपेक्षा होती, परंतु अशा गंभीर मुद्द्यांवर बोलण्यासाठी त्यांच्याकडेही वेळ नाही ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत व्यक्त करीत शंभर कोटी रुपये गोळा करण्यात राज्य सरकार बिझी असल्यानेच महिला आयोगाला अडीच वर्षात अध्यक्ष मिळाला नसल्याची खंत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.त्या अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज चित्रा वाघ यांनी पारनेर येथे तहसीलदार देवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, एका महिला अधिकाऱ्याला झालेल्या त्रासाची दखल घ्यायला सरकारकडे वेळ नाही ही दुर्दैवाची बाब आहे.भाजपाचे तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याने पहिल्या दिवसापासूनच आपण या प्रकरणात लक्ष घातले होते. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती. मात्र,तीन पक्षाच्या सरकारमधील एकाही पक्षाने याप्रकरणी लक्ष घातले नसल्याची खंत वाघ यांनी व्यक्त केली.
राज्यातील महिला अधिकारी जर सुसाईड नोट ठेवून काम करीत असेल तर राज्यात किती आनंदी आनंद आहे हे यावरून स्पष्ट होत असल्याचे सांगताना महिलेने आत्महत्या करेपर्यंत तिची किंमत सरकारला कळत नसल्यानेच वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना मृत्यूने कवटाळले असल्याचेही वाघ यांनी सांगितले.
राज्य सरकार हे शंभर कोटी रुपये गोळा करण्यातच व्यस्त असल्याने अशा गंभीर प्रकरणात लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही.
डॅशिंग महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मागणिकडेही सरकारचे लक्ष नाही
केवळ महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी गेल्या अडीच वर्षात महिला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती केली नाही असे सांगतानाच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला आयोगाच्या नियुक्तीसाठी आठ वेळा मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवूनही आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती झाली नसल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या विधानाचाही चित्रा वाघ यांनी घेतला समाचार
समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केलेल्या विधानाचाही चित्रा वाघ यांनी समाचार घेतला याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, हत्तीच बळ देता कुणाला ? आणि कोणाला कुत्र्याची उपमा देता असा सवाल करीत आपल्या बोलण्याचा व मताचा प्रभाव जनतेवर होत आहे असतो. परंतु अशा बेलगाम सुटलेल्या घोड्यांना बळ देण्याचा प्रकार चुकीचा व दुर्दैवी असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.त्यामुळे हभप महाराज आपल्याला हात जोडून विनंती आहे बोलताना तारतम्य ठेवा असं वाघ म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाईवर भाष्य
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी सरकारने जी धडपड सुरू केली, एवढी तत्परता इतर बाबतीतही सरकारने दाखवावी असं वाघ म्हणाल्या. याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते बोलले आहेत त्यामुळे माझ्या सारख्या छोटया कार्यकर्त्यांने त्यावर बोलणं योग्य होणार नाही असं सांगताना जी भूमिका आमचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आहे तीच माझीही भूमिका असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर जास्त बोलणं टाळलं.