मुंबई : महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलीक हे खुलेआम एका महिलेच्या कौटुंबिक विषयाबाबत सर्व माध्यमांपुढे नाहक बदनामी करातायेत असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ते मौलाना खरं बोलत आहे की, तिच्याजवळ असलेले सरकारी कागदपत्रांची शहानिशा न्यायालयीन प्रक्रीयेतच होऊ शकते. पण , तीच्या व्यक्तीगत आयुष्याचा माध्यमांपुढे सार्वजनिक बाजार मांडण्याचा अधिकार नवाब भाईंना कोणी दिला? सध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री आज उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
सोबतच पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ज्या काँग्रेसी प्रवृत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता, ती काँग्रेसी प्रवृत्ती जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेंव्हा तेंव्हा दलित आणि शोषितांवर अन्यायच होतात असं वाघ यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी एकामागून एक ट्विट करत समीर वानखेडे यांच्या विरोधात अनेक खुलासे केले आहेत. मात्र, त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो आणि काही कागदपत्रे माध्यमासमोर ठेवल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने वैयक्तिक हल्ला करणं योग्य नसल्याचे भाजपकडून म्हटले जात आहे.