भाजपने राष्ट्रवादी फोडून लोकशाहीची हत्या केली - डॉ. उदय नारकर

Update: 2023-07-04 05:34 GMT

राष्ट्रवादीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले आहेत. अजित पवारांच्या बंडावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपच्या या कृष्णकृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करत आहे. असल्याचं म्हटलं आहे.

भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे की " आपल्या पायाखालील राजकीय भूमी भुसभुशीत होत असलेल्या भाजपने २ जुलै रोजी राज्याच्या राजकीय इतिहासातील आणखी एक ओंगळ पान लिहिले आहे. अजित पवार, छगन भुजबळ आणि त्यांच्या सात सहकाऱ्यांनी शिंदे-भाजप सरकारमधील मंत्रिपदाची काल शपथ घेतली. सत्तेवर राहण्यासाठी भाजप किती खालच्या पातळीवरील कारस्थाने करतो, कसलेही विधिनिषेध पाळत नाही, याचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यावर अनिश्चिततेची तलवार टांगलेली होती. या परिस्थितीत जनतेचा नव्याने कौल घेण्याऐवजी भाजपने गैरमार्गाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून लोकशाहीची हत्या केली आहे. भाजपच्या या कृष्णकृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र निषेध करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच भोपाळ येथील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या भ्रष्टाचाराच्या सूत्रधारांवर कारवाई करण्याऐवजी स्वतः पुढाकार घेत त्यांच्यापुढे पायघड्या पसरून त्यांना आता सत्तेत सामील करून घेतले आहे. अशा रीतीने केंद्रीय यंत्रणांची विरोधकांना कमालीची दहशत दाखवून महाराष्ट्रात लोकशाहीची उघड-उघड हत्या केली आहे. जनतेचा पाठिंबा वेगाने गमावत असलेल्या भाजपच्या वैफल्याचे हे फलित आहे. जनमताचा अनादर करणाऱ्या, अनैतिकतेचे शिखर गाठलेल्या भाजपला आणि भयापोटी त्यांना साथ देणाऱ्या घरभेद्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात आणि गेली ९ वर्षे जनतेच्या हितासाठी दिलेली आश्वासने पाळण्यात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-रा. स्व. संघाच्या सरकारला दारूण अपयश आले आहे. त्याचे प्रत्यंतर नुकतेच कर्नाटकपासून मणिपूरपर्यंत आले असून सर्व देशभर भाजपविरोधात असंतोष वेगाने पसरू लागला आहे. पाटणा येथे दिसलेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या दमनयंत्रणांचा वापर करत विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याचे पाशवी तंत्र भाजप वापरत असल्याचे या घटनांतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

आपली हुकूमशाही राजवट पक्की करण्यासाठी विरोधकांच्या दमनाचे फॅसिस्ट तंत्र भाजप आणि रास्व संघ बेमुर्वतपणे वापरत आहे. त्याच्या वापराने आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नष्ट करण्याच्या उद्देशाने भाजपने केंद्रीय यंत्रणांचा दमनकारी वापर केला आहे.

यापूर्वी सर्व प्रकारच्या दमनशक्तीशी प्रखर झुंज घेत बड्या भांडवलदारांची पकड मोडून जनतेने संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण केले. आता पुन्हा कॉर्पोरेट भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी महाराष्ट्राची स्वाभिमानी परंपरा मोदी शासन तुडवण्याचा प्रयत्न करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेत कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य मराठी जनतेने महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे. त्या स्वाभिमानाचे संरक्षण करण्यासाठी, राज्यात लोकशाहीला जीवदान देण्यासाठी, भाजपला जोरदार धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडीने आणि प्रागतिक पक्षांनी राज्यभर पुढाकार घ्यावा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे. अशा आक्रमक व तत्त्वनिष्ठ मोहिमेला महाराष्ट्रातील जनता नक्कीच भरघोस प्रतिसाद देईल, आणि येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, व अजित पवार यांच्या भाजप-प्रणित भ्रष्ट व संधिसाधू युतीला सणसणीत चपराक देईल, याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला खात्री असल्याचे म्हटले आहे.

Tags:    

Similar News