भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी. महाविकास आघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील सरकार पडणार या वक्तव्याचा समाचार संजय राऊत यांनी घेतला. महाराष्ट्रातील सरकारचं 2024 नंतर बघू तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल ही धमकी देणं बंद करावं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आधिवेशनानंतर आज सकाळीच नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे".
त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केल आहे. पण खरं-खोटं नंतर बघू, पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
फडणवीसांनी सामनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "सामना वाचतात हे त्यांनी कबुल केलं. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो".