शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. ईडी हा भाजपचा पोपट आहे, ईडीचा वापर करुन त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर भाजपला हे महागात पडेल असा इशारा संजय राऊत यांनी दिली आहे. दादरमधील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना जशाच तसे उत्तर देईल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल असेही त्यांनी सांगितले. पूर्वी सीबीआय आणि ईडीची नोटीस येणं ही मोठी घटना समजली जायची. मात्र,आता ईडीच्या आणि सीबीआयच्या नोटीसींना कोणीही गांभीर्याने घेत नाही,असंही ते यावेळी म्हणाले. याचसोबत बायका-पोरांवर कारवाई करणाऱ्यांना नामर्द म्हणतात, या भाषेत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ईडी कार्यालयात भाजपने डेस्क टाकलंय.भाजपचे काही नेते सतत ईडी कार्यालयात येतात-जातात. माझ्याकडे पुरावे आहेत,असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. जे मला धमकवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांचा मी बाप आहे,अशा शब्दात त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.
नोटीशीवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
"दहा वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने ५० लाखांचं कर्ज घेतले होते. मात्र,त्यांची नोटीस आज पाठवणं म्हणजे १० वर्षानंतर ईडीला जाग आली आहे. याचा अर्थ जर सरकार कारस्थाने करून पडत नसेल तर ईडीद्वारे पाडण्याचा डाव भाजपवाल्यांनी आखला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर 'मी जर तोंड उघडले तर केंद्रातील नेत्यांना हादरे बसतील,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर भाजप प्रदेश कार्यालय अशा आशयाचा बॅनर लावनू निषेध व्यक्त केला आहे.