शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजपा मैदानात

Update: 2021-09-09 07:08 GMT

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या विविध मागण्या शासन दरबारी धूळखात पडून आहेत. याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होण्यास जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे म्हणत, या मागण्या तातडीने पूर्ण व्हाव्यात यासाठी आता भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

दिरंगाईमुळे शिक्षकांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, व शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले. हेच निवेदन शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शालेय शिक्षण विभाग, मंत्री तसेच उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे. निवेदन भाजपा शिक्षक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धनंजय जगताप, माजी अध्यक्ष व मार्गदर्शक संजय शेंडगे , उपाध्यक्ष सदाशिव कांबळे , कार्यकारिणी सदस्य गणेशराज कसबे, सचिन पवार, एस ए अजबे आदी उपस्थित होते.

* या आहेत प्रमुख मागण्या*

१) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी.

२) वरिष्ठ व निवड श्रेणी च्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित कराव्यात.

३)1नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तात्काळ सुरू करावे

४) एक तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

५) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्ती ची रक्कम तात्काळ देय करावी

६) परिविक्षाधीन सहाय्यक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेत्तर कर्मचारी (शिक्षकेत्तर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे

७) शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी

८) शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्री- स्तरीय १० , २०, ३० आश्वाशीत प्रगती योजना तात्काळ लागू करावी

९) घोषित ,अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी

१०) रात्र शाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालिन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळावेत.

११)पिंपरी चिंचवड मनपा स्तरावरील खाजगी शाळांतील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत.

अशा मागण्या भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Tags:    

Similar News