भाजपच्या नागपूरमधील बालेकिल्ल्याचा पाया खचला - सामना
विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा झालेला दणदणीत पराभव हा त्या पक्षाने आत्मपरीक्षण करावा असा आहे, असा टोला शिवसेनेने सामनामधून लगावला आहे.;
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये भाजपची झालेली पिछेहाट ही बदलत्या राजकीय वाऱ्याची दिशा दाखवते आहे, या शब्दात सामनामधून टीका करण्यात आली आहे सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटले ते पाहूया. ..
महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ''सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,'' असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. शिक्षक, पदवीधरांनी महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीलाच मतदान केले. सगळय़ात धक्कादायक निकाल नागपूरचा आहे. गेल्या पाच दशकांपासून नागपूर पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पक्ष विजयी होत आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पदवीधरांचे प्रतिनिधित्व पंचवीसेक वर्षे केले, पण त्याआधी गंगाधरपंत फडणवीस हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू संघ नेते नागपूरकर पदवीधारकांचे नेतृत्व विधान परिषदेत करीत होते.
सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गंगाधरपंतांचे सुपुत्र. त्यामुळे हा मतदारसंघ किती संघमय झाला होता ते कळेल. संघाचे मुख्यालय नागपुरात आहेच, पण संघ विचारी लोकांचे संघटन मजबूत असताना नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे अभिजित वंजारी येथे विजयी झाले, याचे आम्हाला आश्चर्य वाटत नाही. कारण विधानसभा निवडणुकांतच नागपुरातील दोन जागा भाजपने गमावल्या व उरलेल्या तीन जागांवर भाजपचा निसटता विजय झाला होता. हे चित्र काय सांगते? बालेकिल्ल्यास सुरुंग लागलेच होते, आता पायाच खचला. त्यामुळे भाजपनेही फार मनास लावून घेऊ नये. अमरावती शिक्षक मतदारसंघातही
आता चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली यापेक्षा एकदिलाने लढली हे महत्त्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी जागोजागी गुप्त बंडखोर उभे करून भाजप खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा आहे तो भाजपने. नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱयाची चाहूल आहे. वाऱयाने एक दिशा पकडली आहे व राज्यातील साचलेला, कुजलेला पालापाचोळा उडून जाणार आहे. नागपुरातील पराभव धक्कादायक आहे, तितकाच पुण्यातील पराभवही भाजपसाठी 'आत्मक्लेश' करून घ्यावा असाच आहे.